एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये किंवा विभक्त कुटुंबात राहत असताना देखील लग्न करून सासरी आल्यावर घरातील कामे करावीच लागतात. कामे करायची नसतील, तर लग्नाआधीच तसे सांगायला हवे, असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.
- ॲड. गायत्री कांबळे
लग्न हा एक संस्कार आहे, असे आपण मानतो. त्यामुळे लग्नानंतर सासरी आल्यावर माहेरी जसं वातावरण होतं, तसंच सासरीही मिळेल, याची शाश्वती नसते. परंतु, आदर्श म्हणून माहेरात मिळणारी वागणूक सासरी देखील मिळावी, अशी अपेक्षा असू शकते. काही प्रकरणांमध्ये अशी सुखद परिस्थिती असतेही. मात्र, बहुतांश कुटुंबांमध्ये लग्न करून घरात आलेल्या मुलीला सासुरवास आणि मानसीक छळाचा सामना करावा लागतो, हेही आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. खरं तर प्रत्येक घरातील मुली लग्नानंतर सासरी जातात. त्यामुळे लग्न करून घरात आलेल्या मुलीला स्वत:च्या मुलीचे प्रेम देऊन तिचा सन्मान ठेवता येणे शक्य असते. आणि लग्न करून आलेली मुलगी देखील सासरच्या मंडळींना स्वत:च्या आई-वडिलांसमान मानसन्मान देऊ शकते. अशी देखील काही कुटुंब असतात. परंतु, आजकालच्या व्यक्तीकेंद्री जीवनशैलीमध्ये असे प्रमाण खूपच कमी दिसेल. तरीही एखाद्या कुटुंबात लग्न करून सासरी आलेल्या मुलीला घरातील एखाद्या सदस्याने काही छोटेसे काम सांगितले म्हणून तिला नोकरासारखी वागणूक दिली असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या एका निकालाची चर्चा याच अनुषंगाने सुरु झाली आहे. लग्न झालेल्या विवाहितेला घरातील कामे करायला सांगणे म्हणजे तिला नोकरासारखे वागवणे असा अर्थ होत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पती किंवा सासरच्या लोकांकडून केलेल्या कृतीबाबत आरोप स्पष्ट झाल्याशिवाय ते कौर्य आहे की नाही हे सांगता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अनेकदा काही महिलांकडून सासरच्या मंडळींविरोधात कामाचा जाच केल्याचा आरोप करण्यात येतो. त्यादृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. कुटुंबात राहणाऱ्या महिलेला काम सांगितले याचा अर्थ तिला नोकरासारखी वागणूक मिळते असे नाही. तिला लग्नानंतर घरातील कामे करायची नसतील तर तिने लग्नापूर्वी सांगायला हवे. जेणेकरून मुलाला तिच्याशी लग्न करायचे की नाही ठरवता येईल. त्यामुळे ही समस्या निर्माण होणार नाही असे हायकोर्टाने निकालात म्हटले आहे.
एका महिलेने तिचा पती आणि सासरच्या कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठाने हा निकाल देऊन एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ४९८ अ घरगुती हिंसाचारानुसार, महिलेने पती आणि तिच्या सासरकडील लोकांवर आरोप केले होते. लग्नानंतर तिला नोकरासारखी वागणूक देण्यात आली. सासरच्या लोकांनी चारचाकी खरेदी करण्यासाठी ४ लाख रुपये मागितल्याचा आरोपही महिलेने केला होता.
माझ्या घरच्यांना परवडत नाही असे सांगितल्यानंतर सासरच्यांनी मानसिक आणि शारिरीक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच मुलगा व्हावा यासाठी डॉक्टरकडेही नेले. सासू आणि नणंदेकडून मारहाण केली जात होती. चार लाख रुपये दिल्याशिवाय घरी राहू देणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोपही महिलेने केला होता. मात्र, सासरच्या मंडळींनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. पोलीस तपास आणि वकिलांच्या युक्तिवादानंतर ही केस
उभी राहू शकत नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढला आहे. त्यामुळे काही गोष्टी या अलिखित असतात. आणि लग्नानंतर सासरी गेल्यावर तिथे काही कामे करावी लागतात, त्यामुळे नोकरासारखी वागणूक दिली यात तथ्य असत नाही. अन्यथा कामे करायची नसतील, तक लग्नाआधीच मुलींनी तसे सांगायला हवे असे न्यायालयाने म्हटले आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.