पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी खा. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, आ.अशोकबापू पवार, आ.सचिन अहिर, आ.संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, माजी आ. महादेव बाबर, युगेंद्र पवार आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज पुणे विधानभवन येथे सादर केला, अशीही माहिती त्यांनी फेसबुकवरून दिली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मला पुन्हा लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी, माता भगिनींच्या सन्मानासाठी, युवकांच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी अविरतपणे संघर्ष करत आहे. या संघर्षाला मायबाप जनतेचं पाठबळ नक्की मिळेल, हा विश्वास आहे, असेही त्यांनी सोशल मीडिया हॅण्डलवर म्हटले आहे.