२०१४ मध्ये एका पुरुषावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या फिर्यादीला त्याच पुरुषाकडून दुसरे मूल झाले. मध्यस्थी प्रक्रियेदरम्यान हा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने बलात्कारात शिक्षा झालेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. “प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात,” असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.
- ॲड. गायत्री कांबळे
मैत्री आणि प्रेम या दोन सहसंबंध पण भिन्न गोष्टी आहेत. मात्र, मैत्रीच्या धाग्यातूनच प्रेमाची रेशीमगाठ तयार होते. प्रेमात माणूस अशक्य ते शक्य करून दाखवू शकतो. आणि सगळं हाताशी असताना देखील तो त्या एका माणसासाठी झुरत असतो मात्र, अनेकदा खरं प्रेम प्रत्येकाच्या नशिबात असतेच असे नाही. पण त्या आठवणीत जगणारे अनेकजण आपल्याला आजूबाजूला दिसतात. प्रेम आंधळे असते म्हणतात, ते कदाचित बरोबरही असेल. पण प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्यात खूप मोठी ताकद असते, कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहण्याची, कोणत्याही संकटावर मात करण्याचे बळ असते प्रेम. हीच अवस्था युद्धाची असते. युद्धात फक्त जीत, विजय आपला झाला पाहिजे, त्यासाठी काहीही करावे लागले अगदी जीवाची बाजी लावावी लागली तरी बेहत्तर पण युद्ध जिंकायचेच हा दृढ विश्वास आणि निश्चय केलेला असतो. त्यामुळेच प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असे म्हणत असावेत. आपण या ठिकाणी याचा विचार करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे न्यायालयात दाखल झालेल्या एका प्रकरणात बलात्काराच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
या प्रकरणातील आरोपी आणि २१ वर्षीय महिला दूरचे नातेवाईक असून, ते शेजारी राहत होते. महिलेच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ती तिच्या आजीसोबत राहत होती. २०१२ मध्ये आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला. तिच्यावर जबरदस्ती केली आणि धमकी देऊन बलात्कार केला. २०१४ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. यानंतर तिने आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. २०१७ मध्ये जिल्हा महिला सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली. याला त्याने हायकोर्टात आव्हान दिले.
हायकोर्टाला महिलेच्या पोटी जन्मलेल्या मुलाच्या कल्याणाची चिंता वाटली. या चिंतेचे निराकरण करण्यासाठी, मुलाच्या भवितव्याबाबत तोडगा काढण्याच्या आशेने हे प्रकरण मध्यस्थीकडे हायकोर्टाने पाठवले. मध्यस्थीत तोडगा निघाला नाही. बलात्काराच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करताना, हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, “तक्रार, गुन्हा, खटला किंवा शिक्षा यापैकी काहीही आरोपी व फिर्यादीला वेगळे करू शकले नाही.”
महिला घटनेच्या वेळी प्रौढ होती. तिला माहीत होते किंवा किमान माहीत असले पाहिजे की ती कशात गुंतली आहे. तिने मूल होईपर्यंत कोणताही आरोप लावला नव्हता. त्यांनी अनेक वेळा शरीरसंबंध मान्य केले. ट्रायल कोर्टाने मात्र याकडे दुर्लक्ष केले, असे उच्च न्यायालयाने आदेश देताना म्हटले आहे.
तरुण मुला मुलींनी त्यांच्या इच्छेनुसार जगण्याचा मार्ग निवडल्यास, देशाची घटना नैतिकतेचे विधान करत नाही.हे प्रकरण कदाचित ‘प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात’ या विधानाची साक्ष आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.