पुणे : बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रवेशासाठीची अर्ज प्रक्रिया अखेर मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच ही अर्ज प्रक्रिया इतकी विलंबाने सुरू झाली असून, आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करावा लागणार आहे.
वंचित, सामाजिक दुर्बल आणि मागास घटकातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. या शाळंमधील २५ टक्के जागा ‘आरटीई’मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. यंदा ही प्रक्रिया जवळपास दोन महिने रखडली होती.
शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत या वर्षापासून काही बदल केले आहेत. या बदलांच्या अंमलबजावणीसाठी शाळा नोंदणीलाच उशीर झाल्याने अर्ज प्रक्रियेलाही विलंब झाला. त्यामुळे गेली अनेक वर्षे फेब्रुवारीत सुरू होणारी अर्ज प्रक्रिया यंदा एप्रिल महिन्यात सुरू झाली आहे. या बदलांनुसार विद्यार्थ्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरादरम्यान, अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल, तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
या शाळांची निवड करतांना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व शेवटी खासगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार मुलांना प्रवेश मिळणार आहे. या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करण्यास शिक्षण विभागाने सद्यस्थितीत ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. परंतु, यंदा वाढलेल्या शाळा आणि जागा लक्षात घेता, नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ४ हजार १४ शाळांनी नोंदणी केली आहे. या प्रवेशांसाठी ६० हजार २९६ जागा रिक्त आहेत.