सातारा : महायुतीकडून सातारा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार हे शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित होत नव्हते. अखेर अंतिम टप्प्यात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे सातारा मतदारसंघात उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उदयनराजे भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. उदयनराजे आपल्या निवासस्थानापासून बैलगाडीतून अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. या वेळी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील त्यांच्यासोबत होते.
गांधी मैदानातील सजवलेल्या रथातून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील त्यानंतर साताऱ्यात दाखल झाले होते.
दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे रिंगणात आहेत. या दोघांमध्ये मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात येत असून बैठका आणि वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर सध्या उमेदवारांचा भर आहे.