- संजय आवटे
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा संघर्ष आता वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचला आहे. ‘नणंद विरुद्ध भावजय’ असा हा संघर्ष असला, तरी तो प्रत्यक्षात ‘शरद पवार विरुद्ध अजित पवार’ असा असल्याचे मानले जाते. अर्थात, हा लढा केवळ दोन व्यक्तींचा, एकाच घरातल्या दोघांचा नाही. तो विचारधारांचा, मतदारसंघाचा आणि भूमिकांचाही संघर्ष आहे. त्यामुळे इथे मतदार निर्णायक आहेत!
पण ते असो.
आता हा संघर्ष ‘लेक विरुद्ध सून’ असाही झाला आहे. परवा बोलताना अजित पवार म्हणाले – आजपर्यंत शरद पवार आणि त्यांच्या मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून देण्याची वेळ आली आहे. यात त्यांनी ‘पवारांनाच’ निवडून द्या, असेही सांगून टाकले. म्हणजे त्यांच्या विधानाचा अदृश्य भाग असा की, सुप्रिया या आता सुळे आहेत. पवार नाहीत. (असेच आवाहन अजित पवार बीडमध्ये करतील का, जिथे पंकजा मुंडे त्यांच्या महायुतीच्या उमेद्वार आहेत!) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी तर थेट ठणकावलेच. लग्न झाल्यावर मुलींनी माहेरी लुडबूड करायची नसते.
लग्न झाले की मुलीचा माहेरावरचा अधिकार संपतो, हे यांना सांगितले कोणी? ज्या देशात पं. नेहरूंचा वारसा इंदिरा गांधींनी समर्थपणे पुढे नेला, त्या देशात अन्य उदाहरणांची गरजही भासू नये. माहेरावर सर्व अर्थाने मुलीचा हक्क असतोच. अगदी कायद्याच्या भाषेतही. मुळात, राजकारण ही काही कोणाची मालकी नाही. इतर संपतीसारखा त्यात वाटा सांगण्याचे कारण नाही. पात्र आहे, त्याला वा तिला मतदारांनी निवडून द्यावे. त्यासाठी कोणी कोणाचा मुलगा, मुलगी वा सून असण्याची आवश्यकता नाही. तरीही सुप्रिया सुळे या ‘पवार’ नाहीतच, असे म्हणेपर्यंत मजल जाते कशी!
त्याला शरद पवारांनी दिलेले उत्तर अधिक अनपेक्षित आहे. पवारांना जेव्हा ‘पवार विरुद्ध पवार’ यावर प्रश्न विचारला. तेव्हा पवारांचे उत्तर काय होते? “मूळ पवार कोण आणि बाहेरचा पवार कोण, ते बघावे लागेल”, असे शरद पवार म्हणाले. त्यांच्या या विधानाचा प्रतिभाताईंनाही धक्का बसला असेल!
सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या पवार आहेत. त्या काही मूळच्या पवार नाहीत, असे शरद पवारांना सुचवायचे होते. सून ‘मूळची’ कुठली आहे, या संदर्भात पवारांचे ते विधान होते. याच पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस सोडली आणि नवा पक्ष स्थापन केला. मुळात, कुटुंबासाठी, देशासाठी सर्वस्व पणाला लावणार्या सोनिया बाहेरच्या आहेत, असे कोण म्हणेल? पण तसे म्हटले गेले. सोनियांवर अश्लाघ्य टीका करणार्यांत महिलाही आघाडीवर होत्या.
पवारांनी सुनेला परके म्हणावे, हे तरीही अनपेक्षित. एका मुलीवर थांबणारे आणि त्यातही कटुंबनियोजनासाठी स्वतः नसबंदी करून घेणारे शरद पवार हे कायमच पुरोगामी भूमिका घेणारे नेते. महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे महिला धोरण आले, असे महत्त्वाचे नेते. त्या शरद पवारांनी सून परकी असते, बाहेरची असते, असे म्हणावे?
सहजपणे केली जाणारी अशी विधाने ही आपल्या सामाजिक मानसिकतेची द्योतक असतात. जिथे मुलगी जन्मते, रूजते, वाढते, बहरते ते माहेर तिच्यापासून हिरावून घेतले जाते आणि ती ‘परक्याचे धन’ होते. ज्या नव्या घरात ती जाते, नव्याने रूजते, उभी राहाते, ते घर उभं करते, त्या घरातही तिच्या वाट्याला ठार परकेपण येते. ‘कोरोना’च्या काळात नवरा गेल्यानंतर अनेक सुनांचे किती हाल झाले, ते आपण पाहिले आहे. नवरा गेल्यानंतर स्त्रीला जिवंत जाळणारी, तिचे केशवपन करणारी मानसिकता या देशाने पाहिली आहे. एखादीला मूल नसेल, मग तर तिची स्थिती आणखी बिकट. वंशाला दिवा देणारे यंत्र याशिवाय तिला काही महत्त्व नाही. तिला तिचा अधिकार नाही. तिची ओळख नाही. अनेकांना आठवत असेल. चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना ‘आता घरी बसून भाकऱ्याच थापा’ असा सल्ला दिला होता! हीच ती मानसिकता.
दोन्ही घरी उजेड देणारी स्त्री दोन्हीकडून परकी मानली जावी, या पुरूषसत्ताक व्यवस्थेचे दर्शन अशा निमित्ताने होते. आणि, आपल्याला किती वाट कापायचीय, याचा अंदाज येतो. आणखी एक. राजकारणातील वारसदार म्हणजे जणू आपल्या व्यक्तिगत इस्टेटीचा उत्तराधिकारी अशा प्रकारे जे मानले जाते, त्यातही आपल्या कुटुंबव्यवस्थेच्या प्रारूपाचा मुद्दा येतोच. आपल्या पश्चात राजकारणाची ही जागा आपल्या मुलाबाळांना मिळावी, असा प्रयत्न अनेक ‘राजे’ करतात आणि प्रजेलाही त्यात आश्चर्य वाटत नाही! अमेरिकेसारख्या देशात अध्यक्षांच्या मुली खासगी कंपन्यात काम करतात आणि सार्वजनिक नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांना दंडही होऊ शकतो. इंग्लंडमध्ये साक्षात पंतप्रधानांना वाहतुकीचे नियम मोडले म्हणून शिक्षा होऊ शकते. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना ‘कोरोना’च्या काळात ‘सोशल डिस्टन्सिंग’मुळे हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला जातो. आपल्याकडे मात्र साध्या नगरसेवकाला आपण कोणीतरी ‘मोअर इक्वल’ आहोत, असे वाटते. शिवाय, ही ‘संपत्ती’ पुढच्या पिढीला मिळावी, असेही या नेत्यांना वाटत असते. हे आपल्याकडे सर्वदूर आहे.
पुण्यापुरते पाहायचे तर, पवारांचा वारसा अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याकडे आला. अनंतराव थोपटेंचा वारसा संग्राम थोपटेंकडे. हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील असे नेतेही त्याला अपवाद नाहीत. ज्यांनी वारसा नसताना स्वतःची ओळख निर्माण केली, त्यांनाही आता आपल्या वारसदारांनी राजकारणात यावे, असे वाटू लागले आहे. नेत्यांची मुले-मुली असणे ही काही अपात्रता नाही. पण, ती पात्रताही असू शकत नाही!
या सरंजामी मानसिकतेतून आपल्या राजकारणाचे स्वरूप अधिक पुरूषसत्ताक आणि जातपितृवादी झाले आहे. म्हणून स्त्रीही सोईने हवी असते. ती चेहरा असली तरीही अंतिम सत्ता पुरूषांना आपल्या हातात हवी असते. सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा लढ्यात जी भाषा वापरली गेली, ती तेच सिद्ध करणारी!